भीषण अपघात ! ड्रायव्हरला डुलकी आली अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ५ जणांचा जागेवरच मृत्यू
भीषण अपघात ! ड्रायव्हरला डुलकी आली अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ५ जणांचा जागेवरच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
सोलापूर (भ्रमर वृत्तसेवा) :- अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या कारला ड्रायव्हरला डुलकी लागल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 5 भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला असून, 1 जण जखमी आहे.

पनवेलजवळील खारघर येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ (ता. मोहोळ) भीषण अपघात झाला.त्यात पाच ठार तर एक गंभीर जखमी झाला. वरवडे टोल नाक्यापासून 26 किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातापूर्वी कारचा स्पीड अंदाजे 120 ते 130 किमी होता, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोल नाक्यावर ती कार रात्री 11.14 वाजता आली होती. टोलपासून पुढे दोन ठिकाणी रस्ता खूपच खराब आहे, ज्या ठिकाणी वाहनांचा वेग ताशी 20 ते 30 पर्यंतच ठेवावा लागतो. तरीदेखील, अवघ्या 20 मिनिटांत ती कार 25 किमी पुढे आली होती, असेही पोलिसांनी सांगितले. भीषण अपघातात पाच ठार झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी अपघातस्थळी भेट दिली. त्यावेळी कारचा वेग, अपघाताच्या कारणांचा अंदाज घेण्यात आला.

चालकाने कोठेही न थांबता सलग सहा ते आठ तास वाहन चालविले, रात्री पावणेबाराच्या सुमारास त्याला डुलकी लागली आणि वाहन आहे त्या स्पीडने रस्त्याच्या डाव्या बाजूच्या झाडांवर जोरात आदळले. सुरूवातीला लिंबाच्या झाडाला धडकलेली कार ते झाड तोडून पुढच्या झाडावर जोरात आदळली. कार चक्काचूर झाल्याने कटरद्वारे कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले, असेही पोलिसांनी सांगितले. वाहनचालकांनी सलग वाहन चालवू नये, वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, असे आवाहन भरणे यांनी केले आहे.

अपघातानंतर मोठा आवाज आला आणि परिसरातील नागरीक त्या ठिकाणी धावल्याचे पोलिसांना कळवित आले आणि पोलिसांनी तेथे पोहोचत पुढील कारवाई केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group