पाल येथे राहत असलेल्या नातेवाईकांकडे जाणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. पालपासून जवळ असलेल्या बोर घाटातून जाताना चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पित्यासह तीन वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला. तर आईसह अन्य एक मुलगा गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , भुसावळ येथील पिंटू मोहन बडोले (वय ३०) व रितिक बडोले (३) अशी असे अपघातात मृत बापलेकाची नावे आहेत. दरम्यान पिंटू बोडोले त्यांची पत्नी मालूबाई (वय २८) आणि दोन्ही मुले रितिक व टेंगुराम (वय ८ महिने) हे दुचाकीने पाल येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. सकाळी भुसावळ येथून बडोले परिवार दुचाकीने निघाला होता.
दरम्यान सातपुड्यातील बोर घाट चढत होते. घाट रस्त्यात दुचाकीला धडक बोर घाटातून दुचाकीने जात असताना खरगोनकडून येणाऱ्या चारचाकी मालवाहू वाहनाने बडोले यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामुळे चारही जण दूरवर फेकले गेले. या भीषण अपघातात पिंटू बडोले व चिमुरडा रितिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मालूबाई व टेंगूराम हे मायलेक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मायलेकांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघात झाल्यानंतर वाहन चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस घटनास्थळी येत धडक देणारे वाहन ताब्यात घेतले आहे.