गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे. पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारला प्रचंड विरोधामुळे मागे घ्यावा लागला होता. त्यानंतरही मराठी भाषेच्या अवमान होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
मराठी-हिंदी भाषेवरून राज्यात सध्या वाद सुरू आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे. अशातच या वादात आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे. मराठी भाषेबाबत केतकी चितळेने वादग्रस्त विधान केले आहे.
'मराठी बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार आहेत का?', असा प्रश्न उपस्थित करत केतकी चितळेने वादाला तोंड फोडलं आहे. केतकीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
केतकी चितळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या पोस्टद्वारे तिने राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठीच्या वादावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. तिने मराठी भाषेला अभिजात दर्जाच्या मागणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फरक पडला? महाराष्ट्रात आजही परप्रांतियांना मराठीत बोला, मराठी का येत नाही , अशी विचारणा केली जाते. पण ते मराठी बोलतील किंवा न बोलतील पण त्यामुळे मराठी भाषेला काही नुकसान होणार आहे का? त्याने मराठी भाषेला भोकं पडणार आहे का? असं बोलून तुम्ही स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात.'
तसंच,'मराठी भाषेला अभिजात दर्जा हा क्रायटेरिया २०२४ मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे तर सगळ्या भाषांना दर्जा द्या. अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे.', अशी मुक्ताफळं केतकी चितळेने उधळली आहेत.
तसंच, मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरलेल्या ठाकरे बंधूंवर देखील केतकी चितळेने निशाणा साधला. तिने म्हटले की, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नातवंड एका स्कॉटेज मिशनरी क्रिश्चन कॅथलिक स्कूलमध्ये का जातात? त्याठिकाणी पसायद घेतलं जात नाही. त्याठिकाणी त्यांना का टाकले. ते चालते. पण तुम्ही सर्वांना ज्ञान देत फिरता की मराठीमध्ये बोलणं किती अनिर्वाय आहे किती गरजेचे आहे आणि किती महत्वपूर्ण आहे. स्वत:ची पोरं मात्र मिशनरी शाळेत शिकणार.'