अमरावती : 10 वर्षीय मुलीच्या पोटात तब्बल अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेत हा केसांचा पुंजका बाहेर काढला.
सतत मळमळ, उलट्या आणि भूक न लागण्याच्या त्रासामुळे उपचारासाठी मुलगी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांकडे गेली. तेथील डॉक्टरांनी तिला अमरावती शहरातील डॉक्टरांचा सल्ला घेतला. परंतु मुलीला कुठेच आराम पडत नव्हता.
नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी नागपूरला ही जाऊन आले. परंतु मुलीच्या प्रकृतीत काही एक सुधारणा होत नव्हती. शेवटी त्यांच्या नातेवाइकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुलीला डॉ. उषा गजभिये (बालरोगतज्ञ) यांच्याकडे दाखल केलं. प्राथमिक तपासणीअंती डॉक्टरांनी पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
17 जुलै रोजी करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो वजनाचा केसांचा पुंजका बाहेर काढण्यात आला. केसांचा गोळा पोटात (जठरात) जमा होत गेल्यानं तिला खाणं-पिणं कठीण झालं होतं. या अवस्थेला वैद्यकीय भाषेत ट्रिचोबेझोआर असं म्हणतात.
गेली 3-4 वर्षे मुलगी स्वतःचे केस खात असल्याचं तिच्या पालकांनी डॉक्टरांना सांगितलं. अमरावतीसह नागपूरमधूनही उपचार घेऊनही आराम न झाल्यानं शेवटी डॉ. उषा गजभिये यांच्याकडे दाखल करण्यात आलं. बालरोग तज्ञ डॉ. उषा गजभिये, डॉ. जयेश इंगळे आणि त्यांच्या सर्जिकल टीमनं जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरांनी तिच्या पोटातून 500 ग्रॅमचा केसांचा गोळा बाहेर काढला. केस पोटात साचल्यामुळे तिची पचनक्रिया बिघडली होती. तिला जेवणही शक्य होत नव्हतं. शस्त्रक्रियेनंतर मुलगी आता व्यवस्थित असून जेवते. तसेच पूर्वीपेक्षा अधिक उत्साही असल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितलं.