पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख व युवा उद्योजक पुनीत बालन हे गणेश मंडळांना अर्थिक सहाय्य करत असतात. तसेच त्यांनी यावेळी डिजेमुक्त गणेशोत्सव असा संकल्प केला आहे. त्यानंतर आज 31 जुलै 2025 रोजी त्यांनी चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्यावतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये सांगण्यात आलं की, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.37 वाजता खग्रास चंद्रग्रहण सुरु होत आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणकाळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्या वेळेच्या आधी, म्हणजेच दुपारी 12 वाजण्यापूर्वी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
त्यामुळे यावर्षी पासून अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे दोन्ही मंडळे सायंकाळ नंतर नव्हे, तर मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्या पासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागोमाग मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
तसेच सर्व गणेश मंडळांनी आपली विसर्जन मिरवणूक रविवारी (दि.7) दुपारी 12 पूर्वी संपवावी. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय आम्ही दोन्ही मंडळांनी एकमताने घेतले आहेत. असं देखील यावेळी सांगण्यात आलं.