संतापजनक ! मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा, पुन्हा...
संतापजनक ! मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा, पुन्हा...
img
वैष्णवी सांगळे
कायद्याचे रक्षक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. अडचणीत पोलिसांची मदत मागितले जाते मात्र बऱ्याचदा हे कायद्याचे रक्षकच भक्षक होतात. पुण्यातील एक घटना तुमच्याही अंगावर काटा आणेल. मदतीसाठी पोलिसांकडे आलेल्या तरूणीचा चक्क पोलिस चौकीतच सौदा झाला. पोलिसांनी मदतीसाठी आलेल्या तरूणीला पुन्हा बुधवार पेठेत पाठवल्याची संतापजनक घटना पुणे येथे घडलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील फरासखाना पोलिस ठाण्यात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. मदतीसाठी बांगलादेशी तरूणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. पण तिचा तिथेच पुन्हा सौदा झाला. त्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्यावर झाला. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचलत आरोप असणाऱ्या संबंधित महिला पोलिस हवालदाराला निलंबित केले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली. पण मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे.

या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदारास निलंबित करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group