महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरण वाढत असून, राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी खरातच्या संपर्कात होते, अशी माहिती याआधी समोर आली होती.दरम्यान, या प्रकरणात नवे वळण देत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक सवाल केले आहेत.
नीलम गोऱ्हे गेले पाच ते सहा वर्षे अशोक खरात याच्याकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? याचं कारण नीलम गोऱ्हे यांचे अशोक खरातसोबत चांगले संबंध होते, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला. तृप्ती देसाईंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर धक्कादायक आरोप केले.
अशोक खरात पाथर्डी येथील पैसा हॉटेलमध्ये भेटायला देखील आला होता. तो तिथं तुम्हाला भेटण्यास का आला होता. तुमच्यात आणि त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का? का आणखीन काही हे सगळ्या गोष्टी समोर यायला हवेत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. नाशिकमधील एक्सप्रेस-इन हॉटेलमध्येही नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात यांची भेट झाली. आमदारकी आणि मंत्रिपदसाठी अनेकवेळा भेटल्या होत्या, असा धक्कादायक आरोपही तृप्ती देसाईंनी केला.
नीलम गोऱ्हे यांच्यासोबत अशोक खरात यांना भेटायला जे जात होते, ते मला येऊन भेटले आहेत. त्यांनी मला या संदर्भात सगळी माहिती दिली आहे. आणि वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणेल, असा दावाही तृप्ती देसाईंनी केला. नीलम गोऱ्हे यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं. रूपाली चाकणकरांवर ज्या पद्धतीने कारवाई झाली त्याच पद्धतीने नीलम गोऱ्हे यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी यावेळी केली.
स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरातयाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.