पुण्याच्या मुंढवा भागात एका 35 वर्षीय महिलेची बॅटने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एडवोकेट संजय सावंतला अनैतिक संबंधातून सेक्रेटरीचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संजय सावंत सोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खुनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आलीय.
पुनम दिनेश मुन (वय ३५) असं खुन झालेल्या महिलेचं नाव आहे. पुनम मुन या एडव्होकेट संजय सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला होता.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. संजय सावंत आणि पुनम मुन यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सावंत यांच्या पत्नीला होता. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. गुरुवारी (१६ एप्रिल) दुपारी कार्यालयात पुन्हा एकदा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सावंत, त्यांची पत्नी आणि मुलीने मिळून पुनम यांचे हात-पाय दोरीने बांधले आणि क्रिकेटच्या बॅटने त्यांना बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात पुनम यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपींनी पुनम यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो कार्यालयातच लपवून ठेवला. रात्री उशिरापर्यंत पुनम घरी न आल्याने त्यांचे पती दिनेश मुन यांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली. त्यांनी ॲड. सावंत यांना फोन केला असता, त्यांनी "पुनम नातेवाइकांकडे गेल्या असतील" असे सांगून बनाव रचला. अखेर कुटुंबाने रात्री ११ वाजता लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी संशय बळावल्याने पुनम यांचे पती पुन्हा ॲड. सावंत यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना एक संशयास्पद पोते दिसले. ते पोते उघडले असता, त्यांना स्वतःच्या पत्नीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. या दृश्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी ॲड. संजय सावंत, पत्नी स्वाती सावंत यांना अटक केली आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला तातडीने ताब्यात घेतलं आहे. एका वकिलाने आपल्या कुटुंबासह मिळून अशा प्रकारे हत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.