पुण्यातील पोर्शे कारच्या हिट अँड-रन प्रकरणात दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या नऊ जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. पुण्यातील कल्याणीनगर 'पोर्श हिट अँड रन' या गंभीर प्रकरणातील नऊ आरोपींचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावले.
त्यामुळे या आरोपींना जवळपास दीड वर्षानंतरही जामीन दिलासा मिळू शकलेला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आठ आरोपींची जामिनावर सुटका करण्यास न्यायालयाने नकार दिला.
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आशिष मित्तल, आदित्य सूद, अरुणकुमार सिंग, अशपाक मकंदर, अमर गायकवाड, डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जामीन अर्जावर आक्षेप घेतला.
आरोपीनी या कारच्या हिट अँड-रन प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजे अल्पवयीन आरोपीचे रक्तनमुने बदलण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील साक्षीदार हे वैद्यकीय विद्यार्थी, गरीब व्यक्ती असल्याने आरोपी सहजपणे त्यांना धमकावू शकतात. त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो, असा युक्तिवाद हिरे यांनी न्यायालयात केला.