पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. विमानतळावर बॅगांचं चेकिंग सुरू असताना अचानक महिलेला घाम फुटला. चेकिंगदरम्यान पोलिसांच्या हातात अशी एक गोष्ट सापडली की ते पाहून अधिकारी देखील हैराण झाले.
पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ६ डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर कारवाई केली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या आय एक्स २४१ (IX 241) या विमानाने महिला प्रवासी थेट बँकॉकहून पुण्यात दाखल झाली होती. अधिकाऱ्यांनी काही संशयाच्या आधारावर या महिलेला थांबवून चौकशी सुरू केली. तिच्या सामानाची कसून तपासणी करणे आवश्यक होते.
चेकिंग दरम्यान महिला प्रवाशाकडून तब्बल ७२ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा गांजा अत्यंत चलाखीने चिप्सच्या डब्यांमध्ये लपवण्यात आला होता. जप्त केलेल्या गांजाचे वजन करण्यात आले असता ते ७२२ ग्रॅम इतके भरले. आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित बाजारभावानुसार या गांजाची किंमत ७२.२ लाख रुपये इतकी मोठी आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पुण्यात नेमका कशासाठी आणला जात होता आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेची कसून चौकशी करून या तस्करीच्या जाळ्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.