पुण्यात जमीन व्यवहाराचा घोटाळा सध्या राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू आहे. १८०० रुपये बाजारमूल्य असणारी जमीन केवल ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहे.
धक्कादायक म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
अंबादास दानवे यांनी या व्यवहार उजेड टाकला आहे. या प्रकरणामुळे आता विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकणात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली असून, पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ अजित पवार जमीन घोटाळा प्रकरणाबाबत पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, मंत्र्यांची मुले अशी वागत असतील, तर मंत्र्यांचा दोष आहे. संस्कार महत्त्वाचे असतात. मानवी जीवन जे मिळाले आहे, ते कशासाठी मिळाले आहे. फक्त खायचे, प्यायचे, चैन करून मरायचे, एवढ्यासाठी जीवन नाही. सरकारने धोरणे अवलंबली पाहिजेत, कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
संस्कार हे महत्त्वाचे असतात. एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. राळेगण सिद्धी किती मोठं गाव आहे, पण कधीही गडबड नाही. गोंधळ नाही. पार्थ पवार यांच्या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. असले प्रकार केवळ कारवाईने थांबणारे नाहीत. अशा प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष धोरणे आखून त्याचा अवलंब केला पाहिजे. या प्रकरणाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. असे वागणाऱ्या लोकांना कडक शासन केले पाहिजे, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली.