पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहे.
प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आज गुंड गजा मारणेची बायको जयश्री मारणेला हिलादेखील पुण्यातून उमेदवारी जाहीर केली होती.
एकीकडे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे अशा आरोपींना उमेदवारी देणं कितपत योग्य आहे? असा सवाल पुणेकर विचारत आहेत. दरम्यान, नुकतंच बंडू आंदेकर देखीलपुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष अर्ज भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत तो मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आला होता.