सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती गोऱ्हेंकडून निर्देश; कारण काय ?
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती गोऱ्हेंकडून निर्देश; कारण काय ?
img
वैष्णवी सांगळे
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दाखल घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. आज  विधानपरिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान सभापतींनी गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबनाचे आदेश दिले. 



नेमकं प्रकरण काय?
आज विधानपरिषदेच्या सभागृहात शंभूराज देसाई यांनी आपबिती सांगितली. ते म्हणाले, “मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे, पण इतका भयानक अनुभव मला कधीही आला नव्हता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आमची युती झालेली असताना, आम्ही ३३ सदस्यांसह मतदानासाठी निघालो होतो. मात्र, या सदस्यांचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार करण्यात आली.

मतदान कक्षापासून अवघ्या १० मीटर अंतरावर असताना साध्या वेशातील १०० हून अधिक पोलिसांनी आम्हाला रोखले. मी राज्याचा मंत्री असूनही मला पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले. यामध्ये माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जर मंत्र्यांवर अशी वेळ येत असेल, तर सभागृहात आणि राज्यात आम्ही सुरक्षित आहोत की नाही, अशी भीती वाटतेय, असे शंभूराज देसाई म्हणाले.

शंभूराज देसाई यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. आमदार विक्रम काळे यांनी कामकाज थांबवून या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निवेदन द्यावे, अशी मागणी लावून धरली. तर आमदार मकरंद पाटील यांनी केवळ निलंबन नको, तर संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. सातारा एसपी एका पक्षाच्या घरगड्यासारखे वागले आहेत, अशा कडक शब्दांत आमदारांनी पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.

यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, सातारा SP तुषार दोशी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे. या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज सुरक्षित ठेवले जावे, जेणेकरून पुराव्यांशी छेडछाड होणार नाही. मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश नीलम गोऱ्हे यांनी दिले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group