दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. आधी कोलकता मध्ये डॉक्टर महिलेवर झालेला अमानुष अत्याचार आणि हत्या त्यानंतर बदलापूरच्या घटनेनंतर तर शाळेतील मुलीही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. आता अशीच एक धक्कादायक साताऱ्यातील कराडमधून समोर आली आहे. कराडच्या टेंभू इथल्या निराधार आश्रमात अनाथ मुली आणि महिलांना मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. या आश्रम शाळेच्या संचालिका गतीमंद मुलांकडून मालिश करुन घेत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आश्रमशाळेच्या संचालिका आणि तीच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कराडच्या निराधार आश्रमात जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. गतीमंद मुलींचे देखील हाल सुरु असल्याचं समोर आलं आहे. सातारा - सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली कराड टेंभू इथल्या आश्रमामध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. अनाथ मुली आणि महिलांना या आश्रमात आश्रय दिला जातो आणि त्यानंतर त्यांना मानसिक त्रास आणि अश्लील वर्तणूक करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप एका महिलेने केलेला आहे
दरम्यान , या आश्रमामध्ये गतीमंद मुलीकडून आश्रम चालक महिला पायाला मॉलिश करून घेतानाचा आणि मारहाण करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. एवढेच नव्हे तर आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाक घरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय. यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बॉटल घेऊन त्या बरणीमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी कराड पोलिसांनी 'आई चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रमा'च्या संचालिका आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे