राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकींसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानापूर्वी आदल्या दिवशी साताऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे शाब्दीक युद्ध संपल्यानंतर त्यांचे पर्यावसन हाणामारीत झाली. यामुळे साताऱ्यात काही काळ तणावाचे वातावरण होते. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. पाल जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून उंब्रज पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली. बाळासाहेब चोरेकर हे देवदर्शनावरून परतत असताना हा हल्ला झाला. मारहाण झालेल्या बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर इनोव्हा गाडीतून आले होते. त्यांनी गाडी अडवून चोरेकर यांना मारहाण केली. पाल जिल्हा परिषद गटातील वर्चस्वावरून हा वाद झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.
या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. उद्या या गटासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच झालेल्या या मारहाणीमुळे पाल गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याप्रकरणी आता उंब्रज पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.