सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
फलटणमधील एका हॉटेलमध्ये 23 ऑक्टोबर 2025 रोजी महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. संबंधित महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली होती."गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे," असा गंभीर आरोप त्या डॉक्टरने केला होता. या पुराव्याच्या आधारे फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल करत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक केली होती.
बदने गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने काही अटी घालत बदनेचा जामीन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे तपास यंत्रणांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.