नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत काही विद्यार्थांनी यश मिळविले, दरम्यान परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या यशाचे किस्से चवीने सांगितले जात आहेत. पण, ज्या हजारो, लाखो उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश येते त्यांच्याकडे दुर्लक्षच होते आहे. त्यातच दिल्लीच्या मुखर्जीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका मुलीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मुखर्जीनगरमध्ये २९ वर्षीय विद्यार्थीनी गेल्या १० वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला उत्तर प्रदेशच्या मेरठची रहिवाशी आहे. ती एका गरीब कुटुंबातून येते. तिचे वडील शेती करतात.
मंगळवारी दुपारी महिलेने पीजीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आपलं जीवन संपवलं.
यावेळी तिच्या सोबत दुसरी एक मुलगी देखील होती. मैत्रीनीने तात्काळ पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
मुलगी गेल्या काही महिन्यांपासून पीजीमध्ये राहात होती. ती एक यूट्यूब चॅनेल देखील चालवायची. काही व्हिडिओ, रिल्स ती याठिकाणी पोस्ट करायची. पोलिसांनी मृत मुलीच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळवली आहे. पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत. पीजीमधील इतर मुलींची चौकशी केली जात आहे.