राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे बुलढाण्यात झालेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय. चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्षाचा पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाच्या विरोधात पत्नीने गंभीर गुन्हा नोंदवला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
सततचा कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवरा बायकोमध्ये वाद होत होता. सततच्या होत असलेल्या भांडणातून संतापाच्या भरात चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्षाने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीने समयसूचकता दाखवत पेटलेली साडी पाण्याने भिजवून जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला विशाल काकडे आणि पत्नी नमिता काकडे यांच्यात सुरुवातीला कौटुंबिक कारणातून जोरात वाद झाला. पत्नी-पत्नी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू असतानाच विशाल यांना एका महिलेचा फोन आला. पत्नीने फोन कुणाचा आला? असा जाब विचारला. त्यावर विशाल यांना राग अनावर झाला.
संतापलेल्या विशाल यांनी पत्नीला बेडरूममध्ये नेले व अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र नमिताने समयसूचकता दाखवत तात्काळ पेटलेली साडी पाण्याने भिजवली व आपला जीव वाचवला. त्यानंतर पत्नीने थेट पोलिस स्टेशन गाठले अन् गुन्हा दाखल केला. चिखली पोलिसांनी याप्रकरणी विशाल यांच्यासह आणि दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.