कोल्हापूरमधील कागल तालुक्यात चुलत बहिणीची छेड काढल्याच्या रागात मित्राच्या मदतीने मित्राची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेनं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील (वय 30) असे या खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला. चेहरा दगडाने ठेचलेला, पेट्रोल टाकून पेटवलं चित्रविचित्र अवस्थेत मृतदेह मिळालाय, या घटनेनं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तपास यंत्रणा वेगात करत या प्रकरणाचा काही तासांतच छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या. आशितोष ऊर्फ छोट्या चंद्रकांत पाटील (वय २५, रा. कौलगे, वा. कागल) व सागर संभाजी चव्हाण (वय ३४ रा. चिखली, ता. कागल) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौलगे येथील स्वप्नील ऊर्फ पांडुरंग अशोक पाटील हा बुधवारी सकाळी ९ वाजता 'एमआयडीसी'मध्ये कामाला जातो, असे सांगून घरातून निघाला होता. पण तो घरी परतलाच नाही. दोन दिवस त्याचा कुटुंबियांनी शोध घेतला, तरीही पत्ता लागला नाही. अखेर १७ तारखेला स्वप्नीलचे वडील अशोक गंगाराम पाटील यांना त्यांचा मुलगा स्वप्नील हा खडकेवाडा येथील सामाजिक वनीकरणामध्ये पडल्याचे समजले. वडिलांनी तात्काळ तिकडे धाव घेतली, तिथे पोहचल्यानंतर पायाखालची वाळूच सरकली.
त्यांना स्वप्नीलच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारल्याचे दिसून आले. तसेच त्याची ओळख पटू नये यासाठी त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर काहीतरी ओतून त्याला पेटवून देण्याचाही प्रयत्न केल्याचे आढळून आले. यामुळे त्याच्या डोक्यावरील केस तसेच पाठीवरील शर्ट व बनियन जळाले होते. शेजारीच रंगाने माखलेला दगड ही आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलीस धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला व गुन्हा दाखल केला. कौलगे, चिखली आणि खडकेवाडा या तीन गावांच्या सीमेजवळ अत्यंत निर्जनस्थळी हा मृतदेह आढळून आला. त्यामुळे तेथे कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अगर पुरावा मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारचे साधन नव्हते. परंतु तपास पथकाने मयत स्वप्नील याची माहिती, त्याचे मूळ गावातील राहण्याचे वर्तन, मृतदेह मिळालेले ठिकाण या सर्व ठिकाणी भेटी देऊन, तसेच तांत्रिकदृष्ट्या माहिती घेऊन तपास सुरू केला.
मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक करे यांनी पोलिसपाटील व स्थानिक लोकांच्या मदतीने मयताची ओळख पटवली. गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलिस अंमलदार रोहित मदनि व विजय इंगळे यांनी खबऱ्यामार्फत मयत स्वप्नील अशोक पाटील व त्याच्या गावातील आशितोष पाटील व आणखीन एकजण असे तिघेजण बुधवारी (ता. १५) रात्री एकत्र होते व त्यानंतरच मयत स्वप्नील पाटील हा घरी आलेला नाही, अशी माहिती मिळवली.
त्या आधारे आशितोष ऊर्फ छोट्या चंद्रकांत पाटील याचा शोध घेऊन त्याला कौलगे येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करताच त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. यावेळी त्याने सागर संभाजी चव्हाण हा मित्र सोबत असल्याचे सांगितले. आशितोषच्या चुलत बहिणीची मयत स्वप्नील अशोक पाटील याने सुमारे एक वर्षापूर्वी छेड काढली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी आशितोष याने त्याचा मित्र सागर चव्हाण याच्या मदतीने मयत स्वप्नील अशोक पाटील याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले.
त्यानंतर मयताची ओळख पटू नये म्हणून मोटार सायकलमधील पेट्रोल त्याच्या अंगावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी सागर चव्हाण यालाही चिखली गावातून ताब्यात घेऊन दोघांना अटक केली आहे. अधिक तपास मुरगूड पोलिस करीत आहेत.