कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी याच्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल गवळी हा मानसिक दृष्ट्या फिट असून त्याला सायकीएट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही, असा रिपोर्ट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , आज झालेल्या त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी हा गोपनीय रिपोर्ट सादर केला आहे. विशाल गवळी याने आधीच्या काही प्रकरणांमध्ये मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट देऊन जामीन मिळवला होता.
त्यामुळे या प्रकरणात त्याची पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची चाचणी घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. आज विशाल गवळी याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं असता डॉक्टरांनी तो मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा रिपोर्ट दिला आहे.
विशाल गवळी हा "वेल ओरिएंटेड, कॉन्शियस, को-ऑपरेटिव्ह, ओरिएंटिंग टू टाइम, प्लेस" असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. तसंच त्याला कोणत्याही सायकिएट्रिक ट्रीटमेंटची गरज नसून त्यामुळेच तसं ओपिनियन देखील डॉक्टरांनी दिलेलं नाही. त्यामुळे हा नराधम मनोरुग्ण नसून मानसिक दृष्ट्या फिट असल्याचं सिद्ध झालं आहे.