दैनिक भ्रमर : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टात आत्महत्या केलेल्या वकील प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणी न्यायाधीशावरच गुन्हा दाखल करण्यात आला असून आता न्यायाधीशाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय ?
दोन दिवसांपूर्वी सरकारी वकील विनायक चंदेल यांनी चक्क बीडच्या वडवणी न्यायालयातच सत्काराच्या शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोट्सच्या आधारे आणि कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि अन्य एकावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल याच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा नोंदविला गेला आहे.
न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता. त्यामुळेच, त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबाने केली आहे.दरम्यान, घटना घडल्यानंतर संबंधित न्यायाधीशाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. पोलिस आता आरोपी न्यायाधीशाचा शोध घेत आहेत.