दैनिक भ्रमर : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि पंजाबी अभिनेते जसविंदर भल्ला यांचे निधन झाले आहे. आज त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जसविंदर भल्ला हे पंजाबी सिनेसृष्टीतील एक मोठे नाव होते.
जसविंदर भल्ला यांनी अपन फिर मिलेंगे, मालूल ठीक है, जिजा जी, जिन्हे मेरा दिल लुटेया, पॉवर कट, कबड्डी वन्स अगेन, मेल कारा दे रब्बा, कॅरी ऑन जट्टा, जट्ट अँड ज्युलिएट आणि जट्ट एअरवेज यांसारख्या अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९८८ मध्ये एका काॅमेडी शोने कारकिर्दीची सुरुवात केली होती.
दुल्ला भट्टी या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. विनोदी मालिका आणि पंजाबी चित्रपटांमधील विनोदी पात्र हे जसविंदर भल्ला यांची ओळख बनले होते. त्याच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. २३ ऑगस्ट रोजी मोहालीच्या बलोंगी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. जसविंदर भल्ला यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.