केरळमधील तिरुअनंतपुरम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थंपनूर येथील एका लॉजमध्ये गुरुवारी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २६ वर्षीय आनंदू अजी याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. आपल्या बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांकडून वारंवार लैंगिक छळ झाल्याचे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. मूळ केरळचा रहिवासी असेल्या आनंदूने या प्रकारानंतर मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं होतं.

मयत आनंदु अजी, याने समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये संघाची वडिलांमुळे लहानपणीच संबंध आल्याचे म्हटले आहे. तेव्हापासूनच लैंगिक आणि शारीरिक शोषणाचा सामना करावा लागला. शेजारी असलेल्या एनएमकडून तीन वर्षांचा असताना लैंगिक शोषण झाले. तसंच संघ, आयईटीसी आणि ओटीसी शिबिरांमध्ये देखील असेच प्रकार झाल्याचे म्हटले आहे.
आनंदु अजी याने पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, माझ्या मृत्यूचे कारण कोणत्याही नातेसंबंधाशी नाही. उलट एक मानसिक खोल आघात आहे. काही वर्षांपूर्वी त्याला ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) असल्याचे निदान झाले होते. हे देखील 'आरएसएस'च्या (RSS) लोकांनी केलेल्या शोषणामुळे झाल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
आनंदूच्या गंभीर आरोपांनंतर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "आनंदू अजी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक सदस्यांकडून वारंवार छळ झाल्याचा आरोप केला आहे. संघाच्या नेतृत्वाने यावर तातडीने कारवाई करावी, त्यांनी सत्य समोर आणावे." अशी मागणी प्रियंका गांधींनी केली आहे.प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, आनंदूने दावा केला होता, की तो एकटाच पीडित नाही. संघाच्या शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लैंगिक छळ होत आहे. जर हे खरं असेल, तर हे अत्यंत भयानक आहे. देशभरातील लाखो लहान मुलं आणि किशोरवयीन मुलं या शिबिरांमध्ये जातात. संघाच्या नेतृत्वाने तातडीने यावर कारवाई करत सत्य उजेडात आणावं" असंही त्या म्हणाल्या.
मुलांचा लैंगिक छळ हा मुलींच्या छळाइतकाच गंभीर आणि व्यापक विषय आहे. या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याभोवती असलेलं मौनाचं आवरण तोडले पाहिजं, असेही प्रियांका यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.