हुंडाबळीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात आणखी एक हुंडाबळीच्या प्रकरण समोर आले आहे. सासरच्या छळाला कंटाळून स्नेहा झंडगे या अवघ्या 25 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवल आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वीच तिचं लग्न झालं होत.
स्नेहाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही स्नेहाचं मोठ्या थाटात लग्न लावून दिलं होतं, मोठा खर्च आम्हाला त्यावेळी आला होता. पण यातून सुद्धा झंडगे कुटुंबाच समाधान झालं नाही. तिला वारंवार पैशांची मागणी होत होती. सुरुवातीला स्नेहाला स्वयंपाक येत नाही म्हणून वारंवार तिचा छळ करण्यात येत होता. इतकंच नाही तर शेत जमीन घ्यायला पाच लाख रुपये दिले होते यामध्ये या झंडगे कुटुंबाचं समाधान झालं नाही.
पुढे त्यांनी नवीन कंपनी सुरू करण्यासाठी स्नेहाच्या माहेरच्या मंडळींकडे 20 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी भावाला रक्षाबंधनाला बोलव आणि त्याला येताना पैसे घेऊन यायला सांग, असं स्नेहाला सांगितलं जात होतं. स्नेहाला होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. त्यात भावाला रक्षाबंधनला बोलवायचं आणि त्याला येताना वीस लाख रुपये घेऊन यायला सांगायचं ही बाब तिला अधिकच मानसिक त्रास देणारी ठरली. अखेर रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2025 रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने आपलं जीवन संपवलं.