सरकारी काम अन् दिवस थांब ही म्हण अनेक सरकारी कार्यालयातील कामांना आणि अधिकाऱ्यांना पाहून तंतोतंत शोभते. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एका कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय ?बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात प्रशासकीय दीरंगाईला कंटाळून एका कुटुंबाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.
केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
केज – बीड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वडीलोपार्जित गायरान जमीनीतील क्षेत्रावर लांडगे कुटुंबाची वहिवाट आहे. मात्र, या जमिनीचा ताबा मिळवण्यात त्यांना कायदेशीर अडचणी येत आहेत. केज न्यायालयाने या जमीनीची मोजणी करुन त्याचे सीमांकन करण्याचा आदेश दिलेला होता. या आदेशाबरहुकूम तहसीलदारांनी १२ जानेवारीला भूमि अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचारी, मंडळाचे अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी हे जमीनीवर प्रत्यक्ष हजर राहून मोजणी करणार होते.
केज मोजणी कर्मचारी घटनास्थळी पोहचले, मात्र मंडळ अधिकाऱ्याने मोजणी प्रक्रियेत सहकार्य केले नाही आणि अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या लांडगे कुटुंबाचा संयम सुटला. आणि लांडगे कुटुंबातील सदस्यांनी अंगावर डिझेल ओतले आणि स्वत:ला आग लावल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि कर्मचाऱ्याने वेळीच त्यांना रोखल्याने अनर्थ टळला.