प्रेम आंधळं असतं हे बीडमध्ये झालेल्या घटनेनं संपूर्ण राज्याच्या समोर आलं. बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात बुडालेल्या गोविंद बर्गे यांनी साधारण महिन्याभरापूर्वी आयुष्य संपवलं. पूजा हिने केलेलं ब्लॅकमेलिंग तसंच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, यामुळे गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

याप्रकरणात पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला ताब्यात घेतलं होतं, त्यानतंर तिची रवानगी तुरूंगात करण्यात आली. आत याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिन्याभरापासून तुरूगांच्या गजाआड असलेल्या पूजाची दिवाळीदेखील तुरूंगातच जाणार आहे. कारण न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
गोविंद बर्गे हे पत्नी, मुलं, कुटुंबीय यांच्यासह रहात होते. मात्र विवाहीत असूनही वर्ष-दीड वर्षापूर्वी ते पूजाच्या प्रेमात पडले. गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.
गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता.
आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते. गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते.
याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.