दैनिक भ्रमर : बीड जिल्ह्यातील वडवणी येथे स्थानिक न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी आत्महत्या केल्याने बीड जिल्हाच नव्हे तर राज्यभरात कायदा क्षेत्रात खळबळ माजली आहे. बुधवारी वडवणी येथील स्थानिक न्यायालयात त्यांनी जीवन संपवले. न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच एक नवा ट्विस्ट समोर आला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी एक ई-मेल पाठवला होता. आत्महत्येनंतर पोलिसांच्या हाती हा ई-मेल आणि एक सुसाईड नोट लागली असून दोन्हीही त्यांचा मुलगा विश्वजीत चंदेल यांनी आपल्याच वडिलांची असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या घटनेला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. दरम्यान चंदेल यांच्या आत्महत्येनंतर न्यायाधीश रफिक शेख फरार आहे.
विनायक चंदेल यांनी सर्वोच्च न्यायालयाला केलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी न्यायाधीश रफिक शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चंदेल यांच्या मते, न्यायाधीश शेख कोर्टात सर्वांसमोर त्यांचा अपमान करत होते, तसेच मनमानी पद्धतीने आदेश पारित केले जात होते. केवळ एवढेच नाही, तर न्यायालयातील क्लर्क तारडे यांनी देखील स्वतःला अपमानास्पद पद शब्द वापरून हिणवले असल्याचे त्यांनी ई-मेलमध्ये लिहिले होते. या सर्वांमुळे त्यांना मानसिक छळ सहन करावा लागत होता, अशा आशयाची तक्रार सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती.
हे ही वाचा
आता या ई-मेलमुळे आणि सुसाईड नोटमुळे तपासाच्या दिशेला नवीन वळण लागले आहे. दरम्यान, वकिलांच्या आत्महत्येच्या या घटनेनंतर न्यायालयीन यंत्रणेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी वकिलासारखी व्यक्ती जर स्वतःला न्यायालयात सुरक्षित वाटत नसेल, तर सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकणार कसा, असा सवाल समाजातून उपस्थित केला जात आहे.