सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जुंपली , ''सुरेश धस यांच्यात हिंमत असेल तर...'' राष्ट्रवादीचे थेट आव्हान
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जुंपली , ''सुरेश धस यांच्यात हिंमत असेल तर...'' राष्ट्रवादीचे थेट आव्हान
img
Dipali Ghadwaje
बीड :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीडच नव्हे तर राज्यभरातही संताप व्यक्त केला जात आहे. जनसंतापाची दखल घेत या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून सुरू आहे. दुसरीकडे बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका सुरू आहे.

या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप असणारे आणि खंडणी प्रकरणी अटक झालेले वाल्मिक कराड हे मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे.

त्याशिवाय , आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट लक्ष्य केले जात आहे. आता , बीडच्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जुंपली आहे. राष्ट्रवादीकडून आता आमदार सुरेश धस यांना थेट आव्हान देण्यात आले आहे.

पुण्यातील जनआक्रोश मोर्चात बोलताना आमदार सुरश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आवादा कंपनीच्या खंडणीची डील धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा आरोप करून धस यांनी खळबळ उडवून दिली.

यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही धस यांनी करण्यात आली. धस यांच्याकडून सातत्याने मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी सुरेश धस यांना थेट आव्हान दिलं आहे. सुरेश धस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी असं आव्हान वैशाली नागवडे यांनी दिले आहे. सुरेश धस यांच्यात हिंमत असती तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची बीडला भेट घेतली असती किंवा मंत्रालयाच्या समोर आंदोलन केले असते पण स्वतःच्या पक्षाचे मंत्री असल्यामुळे धस घाबरतात असेही त्यांनी म्हटले.

अजित पवारांवर टीका , अमोल मिटकरी आक्रमक…

पुण्यातील जनआक्रोश मोर्चामधून अजित पवारांवरही टीका करण्यात आली. यावरून अमोल मिटकरी आक्रमक झाले. याची पक्षपातळीवर गंभीर दखल घेतली जाईल, अपशब्द वापरणाऱ्याला त्याचा परतावा व्याजासकट मिळेल असा इशारा आमदार अमोल मिटकरींनी दिला. पुण्यातील जनआक्रोश मोर्चातील भाषणामध्ये अजित पवारांवर टीका करण्यात आली. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरला त्या कोणालाही सुट्टी भेटणार नाही, असा इशाराही मिटकरी यांनी दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group