बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सह्याद्री देवराई' प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे होरपळून निघाली असून, निसर्गप्रेमींमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी सयाजी शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले. मात्र, डोळ्यादेखत झाडांची नासधूस झाल्यामुळे सयाजी शिंदे भावुक झाले.
बीडमधील घटना अत्यंत दुर्देवी .... सयाजी शिंदे आणखी काय म्हणाले ?
"गवत जाळल्यानंतर परत चांगलं उगवतं, हा गैरसमज आहे. निसर्गाचं प्रचंड नुकसान होतं. पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची पिल्ले, झाडं, रोपटी आगीत जळून खाक होतात. घरावर बॉम्ब पडल्यावर काय अवस्था होते. तशी प्राण्यांच्या घरांचीही होते", "बीडमधील घटना अत्यंत दुर्देवी आहे. 2017ला जिथं गवत पण उगवत नव्हतं, ओसाड जागा होती, अशा ठिकाणी झाडं उगवली. रान हिरवंगार झालं. सयाजी शिंदे फक्त निमित्त आहे, पण रान हिरवेगार करण्यामागे अनेकांचं हात आहे", असं सयाजी म्हणाले.
१५ लाख झाडांचं हिशोब द्या
"अत्यंत भयानक होतं हे सगळं. आपल्या घरातलंच कोणतरी जातं, अशी भावना मनात येते. "मे - जून महिन्यांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कलेक्टर यांनी सांगितले की, बीडमध्ये 15 लाख झाडं लावली, याची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली. कलेक्टरचा सत्कारही करण्यात आला. त्यांनी आता उत्तर द्यावं. कुठेही यांनी बीडमध्ये 15 लाख झाडं लावली हे सांगावं. साताऱ्याहून मी बीडला जात होतो, एक-एक झाडांची मी काळजी घेतली. आता बीडच्या कलेक्टरने सांगावं कौतुक करवून का घेतलं? १५ लाख झाडांचं हिशोब द्या, ते देऊ शकता का?", असा थेट सवालही एका खासगी माध्यमाशी बोलताना त्यांनी उपस्थित केला.
तपोवनमधील झाडांची कत्तल करणं चुकीचं
"झाडांच्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला हवे. झाडांची कत्तल केल्यानंतर दुसर्या ठिकाणी आपण झाडं लावतोय का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यकर्त्यांनी कसे वागावे, हे सर्वस्व त्यांचा प्रश्न आहे. तपोवन वाचलं पाहिजे. तपोवनमधील झाडांची कत्तल करणं चुकीचं आहे. आतापर्यंत 20-30 देवराई झाले आहेत. ४० पर्यंतचा आकडा आहे. जोपर्यंत मी जीवंत आहे. तोपर्यंत मला १०० देवराई तयार करायचे आहेत, असं माझं स्वप्न आहे", असंही सयाजी शिंदे म्हणाले.