गेल्या काही दिवसांपासून बीड मधून खळबळजनक घटना उघडकीस येत आहे. आता पुन्हा एकदा मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयराम बोराडे या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांची तीन वर्षीय मुलगी घरातून त्यांच्यासोबत बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर या चिमुकलीचा थांगपत्ता लागत नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थ तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण आज सकाळी त्या परिसरातील एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार आत्महत्या आहे की यामागे कुठला गुन्हेगारी हेतू दडलेला आहे, याबाबत पोलीस विविध कोनातून तपास करत आहेत. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुहेरी मृत्यूमुळे इमामपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या अंतराने वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.