राजधानी दिल्लीतुन एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. माथेफिरू तरुणाने बायको आणि ३ चिमुकल्या मुलींची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीच्या चंदन पार्क परिसरात आरोपी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याला तीन मुली होत्या. आरोपी रोजगाराच्या शोधात दिल्लीत आला होता. चंदन पार्क परिसरात तो भाड्याने घर घेऊन राहत होता. तो आजादपूर बाजारात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. आज सकाळी त्याने बायको आणि तीन मुलींची हत्या केली. हत्या झालेल्या महिलेचे नाव अनीता होते. तर हत्या झालेल्यांमध्ये ७, ५ आणि ३ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे.
आरोपीने बुधवारी सकाळी बायको आणि तीन मुलींची चाकूने गळा चिरून हत्या केली. याबाबत शेजारच्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. कौटुंबीक वादातून त्याने हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे चंदन पार्क परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याच्या शोधासाठी टीम तयार केल्या आहेत.