हनी सिंग आणि बादशाहला दिल्ली हायकोर्टाने फटकारले, महिलांचा अपमान करणारं 'ते' गाणं काढून टाकण्याचे आदेश
हनी सिंग आणि बादशाहला दिल्ली हायकोर्टाने फटकारले, महिलांचा अपमान करणारं 'ते' गाणं काढून टाकण्याचे आदेश
img
वैष्णवी सांगळे
प्रसिद्ध गायक, रॅपर हनी सिंग आणि बादशहा यांना दिल्ली हायकोर्टाने फटकारले आहे. दोन दशकं जुन्या गाण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत ते सर्व प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारची कलाकृती महिलांकडे केवळ 'लैंगिक उपभोगाची वस्तू' म्हणून पाहण्याच्या मानसिकतेचे समर्थन करते, जे सुसंस्कृत समाजात कदापि स्वीकारार्ह नाही.



 'वॉल्यूम १' (Volume 1) या दोन दशकं जुन्या गाण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत ते सर्व प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. हे गाणे अत्यंत अश्लील, बीभत्स आणि महिलांचा अवमान करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर 'हिंदू शक्ती दल' या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने हे गाणे चेंबरमध्ये ऐकले आणि त्यातील मजकूर इतका आक्षेपार्ह असल्याचे आढळले की, गाण्याचे शीर्षकही न्यायालयाच्या आदेशात नमूद करणे उचित ठरणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, "हे अशा दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे ज्याने न्यायालयाच्या विवेकाला मुळापासून हादरवून सोडले आहे. कलात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला थारा दिला जाऊ शकत नाही. हे गाणे केवळ अपमानजनकच नाही, तर स्त्रियांना केवळ एक 'वस्तू' म्हणून बघण्याच्या मानसिकतेचा प्रसार करणारे आहे." विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी अशा प्रकारचा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असणे ही गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

'माफिया मुंदीर' या समुहाअंतर्गत २००६-०७ मध्ये हे गाणे प्रदर्शित झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हनी सिंग आणि बादशहा या दोघांनीही या गाण्याशी आपला संबंध नाकारला होता. युट्यूब, गूगल आणि स्पॉटिफाय यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गाण्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या हिंदू शक्ती दलानं दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी केली आहे. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की, अलीकडील एका कॉन्सर्टमध्ये हनी सिंगनं गाण्याच्या काही ओळी गायल्या होत्या, ज्यामुळे हे गाणं त्यानंच गायले आहे हे सिद्ध होतं.

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकार, सोशल मीडिया कंपन्या आणि संगीत क्षेत्रातील संबंधित कंपन्यांना हे गाणे सर्व स्वरूपात ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, या गाण्याचा कोणताही भाग मग तो ऑडिओ असो, व्हिडिओ असो किंवा गाण्याचे बोल असोत, सार्वजनिक स्वरूपात कुठेही उपलब्ध राहता कामा नयेत. सुनावणी दरम्यान गुगलच्या वकिलांनी माहिती दिली की, याचिकेत नमूद केलेले काही यूआरएल (URLs) आधीच हटवण्यात आले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयानं हनी सिंग आणि बादशाह यांनाही नोटीस पाठवली असून, गाणी असलेल्या यूआरएल (URLs) तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. इतकंच नव्हे तर, न्यायालयानं याचिकाकर्त्याला वादग्रस्त गाणं असलेल्या इतर लिंक्सची (रिमिक्ससह) यादी तयार करून ती केंद्र सरकारकडे सादर करण्याची मुभा दिली आहे, जेणेकरून सरकार ऑनलाइन प्लॅटफॉर्मना त्या लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश देऊ शकेल. पुढे, या प्रकरणाची सुनावणी आता ७ मे रोजी होईल, असं न्यायालयानं सांगितलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group