दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना एक महत्वाचा मेसेज दिला आहे.
'माझी चिंता करू नका, मी लवकरच बाहेर येईन.', असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. नुकताच सुनीता केजरीवाल आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर आतिशी यांनी माध्यामांशी संवाद साधत केजरीवाल नेमकं काय म्हणाले हे सांगितले.
आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी मुख्यमंत्री अरविंद यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की, तुम्ही लोकांनी माझी काळजी करू नका, फक्त दिल्लीच्या जनतेची काळजी करा आणि त्यांची काळजी घ्या. त्यांनी मला दिल्लीतील जनतेला दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधांची सद्यस्थिती विचारली आणि उन्हाळ्यात कोणालाही पाण्याची कमतरता भासू नये असे निर्देश दिले. यासोबतच त्यांनी दिल्लीतील माता-भगिनींना सांगितले आहे की, ते लवकरच तुरुंगातून बाहेर येतील आणि त्यांना एक हजार रुपये मानधन देईन.'
आतिशी यांनी पुढे सांगितले की, 'मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मला विचारले की मुलांना पुस्तकं वेळेवर पोहोचतात का? मुलांना अभ्यासात काही अडचण येत आहे का? दवाखाने आणि रुग्णालयातील समस्या सुटल्या की नाही? दिल्लीतील लोकांना औषधे मिळत आहेत की नाही? केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.
तसंच, लवकरच तुरुंगातून बाहेर येईल असं सांगत त्यांनी दिल्लीतील महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या मानधनाची योजना आखत असून लवकरच त्यांना एक हजार रुपये दिले जातील असे सांगितले.