लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्या. संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं शुक्रवारी हा निर्णय दिला.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीत मतदान होणार आहे. त्याआधीच अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानं हा आम आदमी पक्षासाठी सर्वात मोठा दिलासा आहे, असं मानलं जात आहे.
अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन देण्याबाबतची विनंती सुप्रीम कोर्टात केली होती. त्यावर न्या. संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दिल्लीतील मद्यधोरण प्रकरणात झालेल्या अटकेला आव्हान देतानाच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता यावं यासाठी अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी विनंती केजरीवाल यांनी या याचिकेद्वारे केली होती.
कोर्टानं काय सांगितलं?
अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं तब्बल ५१ दिवसांनी ते तुरुंगाबाहेर येतील. कोर्टानं सांगितलं की, अरविंद केजरीवाल यांना २० दिवसांसाठी अंतरिम जामीन देत आहोत. २ जूनपर्यंत प्रचारावर कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत.