विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे, अशातच ठाकरेंना जळगावात मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव महापालिकेतील 13 नगरसेवक लवकरच भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. यात दोन माजी महापौरांचाही समावेश आहे. भाजपाची ही खेळी उद्धव ठाकरेंना नक्कीच अस्वस्थ करणारी आहे.
जळगावचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वात सर्वजण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरील ही घडामोड भाजपला बळ देणारी ठरणार आहे.
यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. नितीन लढ्ढा यांच्या फार्म हाऊसवर सगळे एकत्रित जमले होते. या बैठकीला एकूण 13 नगरसेवक हजर होते. भाजपप्रवेशाची तारीख मात्र अद्याप ठरलेली नाही.
या बैठकीला ठाकरे गटासह शिंदे गटाच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे जळगावच्या राजकारणात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.
आमचे नेते सुरेश दादा जैन यांच्याशी चर्चा झाली आहे. भाजप प्रवेशाच्या बाबतीत अंतिम निर्णय त्यांचाच राहील. त्यांनी निर्णय दिल्यानंतर भाजपप्रवेशाच्या तारखे वर शिक्कामोर्तब होईल. असे नितीन लढ्ढा यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सुरेश जैन काय निर्णय देतात याकडे या इच्छुक मंडळींचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे जर या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला तर निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत.
निवडणुकीत पक्ष संघटना बळकट करण्याचे नवे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिल. दुसरीकडे जळगावात भाजपाची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकीत याचा भाजपला फायदा होणार आहे.