जळगाव मध्ये अस्थीचोरीची सलग दुसरी घटना समोर आली आहे. मेहरूण येथील आधीच्या घटनेत छबाबाई पाटील यांच्या अस्थी चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच शिवाजीनगर स्मशानभूमीतही असाच प्रकार घडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्मशानभूमीत छबाबाई पाटील या महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी आणि मान-पायाजवळील दागिने गायब झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घटनेचा धक्का शहरभर पोहोचत असतानाच हा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

शिवाजीनगर परिसरातील खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांचे निधन झाले होते. त्यांच्यवर परवा शिवाजीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी नातेवाईक अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत आले असता, त्यांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी राखेसह डोके आणि पायाजवळील अस्थी गायब झाल्याचे पाहून धक्का बसला. त्याचबरोबर जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे चार ग्रॅम सोन्याचे दागिनेही गायब झाल्याचे लक्षात आले.
या घटनेमुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. आश्चर्य म्हणजे, चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मृतदेहाच्या ठिकाणी पंचपक्वान्न असलेले भोजनाचे पान ठेवलेले आढळले ,ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि चीड दोन्ही निर्माण झाली आहे.