'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी गेल्या चार दिवसांपासून महापालिकेत ऑनलाईन आणि ऑफलाईन फार्म भरून घेणे सुरू आहे. मात्र, शुक्रवारी (ता. १२) सर्व्हर डाऊनअसल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या कामाला फटका बसला असून, काही महिलांना अर्ज न भरता घरची वाट धरावी लागली त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली.
आता दोन दिवस महापालिकेला सुट्टी असल्याने या योजनेच्या कामाला ब्रेक लागणार आहे. महापालिकेत गेल्याचार दिवसांपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्यासाठी दिवसागणिक महिलांची गर्दीवाढत आहे.
मात्र, शुक्रवारी दुपारनंतर सर्व्हर डाउन असल्यामुळे अर्ज भरण्याच्या कामाला ब्रेक लागला.कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करूनही अर्ज भरण्यास सर्व्हर डाऊनचा फटका बसत असल्याने महिलांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळी ११ ते दुपारी बारा पर्यंत सर्व्हर हळूहळू चालत असल्याने कर्मचारीही त्रस्त झाले होते. दुपारनंतर सर्व्हर डाउन झाल्यामुळे अर्ज भरण्याच्या कामकाजाला ब्रेक लागला आणि महिलांना तासन्तास उभे राहावे लागले. काही महिलांनी कंटाळून अर्ज न भरताच घराची वाट धरली, तर काही महिला सायंकाळी साडेपाचपर्यंत ठाणमांडून बसल्या होत्या.
शनिवारी (ता. १३) आणि रविवारी (ता. १४) महापालिकेस शासकीय सुट्टी असल्याने दोन दिवस लाडकी बहीण योजनेचे कामकाज बंद राहणार आहे. सोमवारी (ता. १५) पुन्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक, वयासाठी व रहिवाससाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकेची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. ज्या लाभार्थ्यास ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेत महिलांची गर्दी होत आहे.