मराठा समाज आणि मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप समोर येताच मराठा समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या. जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती समोर आली होती.
त्यानंतर बकालेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी संघटनांकडून करण्यात होत होती. सप्टेंबर २०२२ मध्ये ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. दरम्यान, आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपच्या सतत्येची पडताळणी करत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी विभागीय चौकशी करत त्याचा अहवाल पोलिस महासंचालकांकडे दिला होता.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर खातेअंतर्गत त्याची चौकशी देखील सुरू होती. दरम्यान, मराठा समाजातील संघटनांकडून फक्त निलंबन नको तर सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. कारवाई न झाल्यास जाणीवपूर्वण मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या मनोविकृतीला त्यांच्याच भाषेत उत्तर देखील समाजात असल्याचा इशारा देण्यात आला होता.
चौकशीअंती बकाले यांना दोषी ठरवून त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पोलिस महासंचालकांच्यासमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी देखील बकाले यांना देण्यात आली होती. मात्र, त्याने नवीन कोणताही मुद्दा मांडला नाही तसेच त्याच्यावरील आरोपांचा प्रतिवाद देखील करता आला नाही. अखेर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बकाले याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश काढले.