जळगावमधून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. अंत्यसंस्कारानंतर चक्क महिलेच्या अस्थींची चोरी करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावच्या मेहरूण येथे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थी चोरीस गेल्याची घटना समोर आली. मृत छबाबाई पाटील यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचले असता त्यांना समोरील दृश्य पाहून धक्काच बसला.
छबाबाई यांच्या डोके, पाय व हाताच्या अस्थी गायब असल्याचं कुटुंबाच्या लक्षात आले. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, अंगावर असलेले सोने काढण्यासाठी अस्थी चोरी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोनं नको, फक्त अस्थी परत देण्यात याव्यात, अशी मागणी कुटुंबाकडून होत आहे.