जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जळगावात घडली असून, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , हल्ल्यानंतर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी त्याला रूग्णलयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अरविंद सचिन गायकवाड (वय ४ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी आहे.
अरविंद आपल्या अंगणात खेळत होता. खेळत असताना अचानक पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या पिसाळलेल्या कुत्र्याने अरविंदच्या चेहऱ्यावर, मानेला आणि गळ्याला खोल जखमा करत लचके तोडले.
कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात अरविंद रक्तबंबाळ झाला. कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ अरविंदला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असून, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात इतर ४ ते ५ जणांनाही चावा घेतल्याचे समजते. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.