'मी गेल्यावर ही माझी स्टोरी स्टेटसला टाका', सुसाईड नोटमध्ये व्यथा मांडत १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
'मी गेल्यावर ही माझी स्टोरी स्टेटसला टाका', सुसाईड नोटमध्ये व्यथा मांडत १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
जळगाव शहरातील देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.  रविवारी (दि.१६) ही घटना घडली. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे ज्यामध्ये त्याने आत्महत्येचे खळबळजनक कारण लिहिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील शेतकरी कुटुंबातील श्याम प्रभाकर पाटील असे आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांचे नाव आहे. श्याम पाटील हा जळगावातील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. या कॉलेजमधील प्राचार्य योगेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामला पीव्हीसी पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. याबद्दल विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. तसेच "माझी स्टोरी इन्स्टावर टाक जो," अशी शेवटची विनंती देखील त्याने आपल्या मित्राला केल्याचे सुसाईड नोट मध्ये लिहिले होते. श्यामच्या खिशात सापडलेल्या 'सुसाईड नोट' वरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुसाईड नोट मधील हृदयद्रावक व्यथा
श्यामने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे की, "माझी कोणतीही चुकी नसताना प्राचार्यांनी मला सर्व शिक्षक स्टाफ आणि मित्रांसमोर अपमानित करून मारहाण केली. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलो असताना, समोरचा मुलगा मुले घेऊन आला तरी प्राचार्यांनी त्याला काहीच म्हटले नाही. उलट मलाच पीव्हीसी पाईपने मारले आणि शिवीगाळ केली. गुरु मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही मारत." पत्राच्या शेवटी त्याने आपल्या मित्राला उद्देशून, रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक, अशी भावपूर्ण विनंती देखील केली आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. प्राचार्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तणावत असल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आता या प्रकरणी प्राचार्याला काय शिक्षा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group