बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वंश वाढीसाठी मुलगाच हवा, या मागासलेल्या मानसिकतेतून एका २६ वर्षीय विवाहितेचा बळी गेल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. तीन मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून भक्ती अमोल कोरडे (रा. म्हाळसापूर, ता. बीड) या विवाहितेने कीटकनाशक प्राशन केले होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ६ मार्च रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय ?
भक्ती कोरडे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी म्हाळसापूर येथील अमोल कोरडे यांच्याशी झाला होता. संसाराच्या सुरुवातीच्या काळानंतर त्यांना तीन मुली झाल्या. मात्र, वंशाला दिवा हवा म्हणजेच मुलगाच हवा, या हट्टापायी सासरच्या मंडळींनी भक्ती यांचा छळ सुरू केला. गेल्या अडीच वर्षांपासून हा मानसिक आणि शारीरिक छळ पराकोटीला पोहोचला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीला दुसरे लग्न करण्यासाठी भक्तीने संमती द्यावी, यासाठी सासरच्या लोकांकडून तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता. इतकेच नाही तर, 'दुसऱ्या लग्नाला माझी हरकत नाही', असं तिला चक्क बाँड पेपरवर लिहून देण्यासाठी मारहाण करून सक्ती केली जात होती. सततचा अपमान आणि होत असलेल्या मारहाणीमुळे भक्ती प्रचंड तणावाखाली होत्या.
या जाचाला कंटाळून अखेर 2 फेब्रुवारी 2026 रोजी भक्ती यांनी आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचं लक्षात येताच त्यांना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती खालावल्याने नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन मुलींच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरवल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी भक्ती यांची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल अर्जुन कोरडे, सासरे अर्जुन साधू कोरडे आणि सासू आशाबाई अर्जुन कोरडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल करत आहेत.