हृदयद्रावक ! सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
हृदयद्रावक ! सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
img
वैष्णवी सांगळे
सोलापुरात एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड येथील एसआरपीएफच्या एका जवानाने सोलापूरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विलास सर्जेराव शिंदे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. विलास शिंदे हे मूळचे कळंब (जिल्हा धाराशिव) येथील रहिवासी होते. 

मागील अनेक वर्षांपासून ते सासरच्या घरी मुळेगाव (दक्षिण, सोलापूर) येथे राहत होते. एसआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. ही घटना १२ मार्च रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास समोर आली. विलास शिंदे यांना गुरुवारी रात्रीच सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शिंदे यांच्या पत्नीच्या आरोपावरून सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विलास शिंदे यांचा मामा आरोपी भीमाशंकर काळे यांच्यासोबत जुन्या केसच्या कारणावरून वाद होता. या कारणातून भीमाशंकर काळे व भाग्यश्री काळे यांना जेल रोड पोलिसांनी दोन-तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. यावरून १२ मार्च रोजी दुपारी विलास हे मुळेगाव येथील घरी असताना ६ जणांनी मुळेगाव येथील घरी येऊन त्यांना शिवीगाळ करून आमच्यावरील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घ्या, नाहीतर तुकडे करून मारून टाकीन अशी धमकी देऊ लागले.

हे भांडण सुरू असताना एकाने विलास यांना चपलेने मारहाण सुरू केली. हे चित्र आजूबाजूचे लोक पाहत होते, यामुळे विलास रडत होते. यातूनच नैराश्येत आणि तणावात येऊन विलास यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विलास यांच्या पत्नी पूनम विलास शिंदे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


इतर बातम्या
नाशिक :

Join Whatsapp Group