सोलापुरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रियकाराने धोका दिल्यामुळे नैराश्येत येऊन एका तृतीयपंथीयाने गळफास घेत आयु्ष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तृतीयपंथीयाने व्हिडीओ तयार केला होता ज्यात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना सोलापुरच्या बाळे या गावात घडली. प्रकाश कोळी असं आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव होते. प्रकाश कोळीचे गेल्या अनेक वर्षांपासून सुजित जमादार या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ८ वर्षांपासून एकत्र राहत होते. पण सुजितने प्रकाशला धोका दिला त्यामुळे तो नाराज झाला होता.
सुजित जमादारचे एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. काही दिवसांतच त्याचे लग्न होणार होते. आपली फसवणूक करून सुजित दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत असल्यामुळे प्रकाश नैराश्येत गेला. प्रकाश कोळीने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार केला आणि प्रेमात धोका मिळाल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रकाशचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरात तृतीयपंथीयांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.