किडनी विक्रीप्रकरणी पोलिसांना तपासात मोठे यश मिळाले आहे. ज्याच्या माध्यमातून रोशन कुडे या शेतकऱ्याने कंबोडियात किडनी विकली. तो डॉ. कृष्णा पोलिसांच्या हाती लागला आहे. मुत्रपिंड विक्री प्रकरणातील मुख्य एजंट डॉ. कृष्णा याला विशेष तपास पथकाने सोलापूर येथून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. सर्वत्र डॉ. कृष्णा नावाने वावरत असलेल्या या एजंटचे खरे नाव मल्लेश असे आहे. तो अभियंता असल्याचे सांगितले जात आहे.
कापड व्यवसायात अपयश आल्याने मल्लेशने स्वत: आठ लाखांत मूत्रपिंड कंबोडियात विकले आहे. तो आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या गरिबांचा शोध घ्यायचा आणि त्यांना मूत्रपिंड विक्रीसाठी प्रोत्साहन द्यायचा. या प्रकरणात आणखी बरेच पीडित असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
फेसबूक पेजच्या माध्यमातून रोशन कुडे हा शेतकरी त्याच्या संपर्कात आला. व्हॉट्सॲप चॅट आणि फोनच्या माध्यमातून हे दोघे संपर्कात होते. त्यानेच रोशनला किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि मोबदल्यात आठ लाख मिळतील, असे सांगितले. रोशन कंबोडियाला जाण्यापूर्वी त्यांची पहिली भेट कोलकाता इथे झाल्याचे सांगितले जाते.
आरोपी कृष्णा हाही कपडा व्यवसायात अपयशी ठरला होता आणि त्यानेही आपली किडनी विकली, हे विशेष. तो डॉक्टर म्हणून वावरत असला तरी मुळात तो इंजिनिअर असल्याचे सांगितले जाते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यात हे रॅकेट सक्रिय असतानाच महाराष्ट्रात चंद्रपूर आणि नाशिकनंतर आता सोलापूरचे नाव समोर आले.
त्यामुळे हे रॅकेट आणखी किती ठिकाणी पसरले आहे, याचा शोध सुरू असून, आरोपी कृष्णा हा त्यासाठी मोठा आधार ठरणार आहे. दरम्यान,काल रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.