जन्म आणि मृत्यू मानवाच्या हातात नाही. त्यामुळे जन्म कधी होणार आणि मृत्यू कधी होणार हे सांगता येत नाही. त्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या मानसिक त्रासामुळे, वातावरण बदलामुळे ह्रदयविकाराच्या झटका कधी येईल हे सांगता येत नाही. सोलापूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डीजेच्या तालावर नाचता नाचताच एका तरुणाला ह्रदयविकाराच्या झटका आला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अभिषेक बिराजदार असे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सोलापुरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अभिषेक या तरूणाचा काही वेळापूर्वीचा डीजेच्या तालावर ठेका धरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डीजेच्या तालावर ठेका धरत असताना त्याला अस्वस्थ जाणवलं.यामुळे अभिषेक काही वेळासाठी खाली बसला. मात्र, त्यानंतर खाली कोसळला. स्थानिकांनी त्याला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.