माजी राष्ट्रपतींचे स्वीय सचिव, रविंदसिंह जाधव यांचे हृदयविकाराने निधन
माजी राष्ट्रपतींचे स्वीय सचिव, रविंदसिंह जाधव यांचे हृदयविकाराने निधन
img
चंद्रशेखर गोसावी
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे स्वीय सचिव रवींद्रसिंह जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ७३ वर्षाचे होते. जळगाव येथे मंगळवार दि. ९ जुलै रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रवींद्रसिंह जाधव यांनी नाशिकचे विभागीय आयुक्तपद देखील सांभाळले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड या त्यांच्या मूळगावी गेले असता तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. १९८० साली शासकीय सेवेतील उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. त्यांनी राज्यभर महत्वाचे पदे भूषवत आपल्या कामाचा ठसा उमटवला. 

आपली सेवा देत असताना त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे स्वीय सचिव म्हणून काम केले. यापूर्वी त्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, पुणे आणि अमरावती विभागाचे राज्य माहिती आयुक्त, अमरावतीचे जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदावर त्यांनी काम केले आहे. 

नाशिकचे विभागीय आयुक्त असताना जाधव यांनी अनेक लोकाभिमुख प्रकल्प राबवून वेगळा ठसा उमटवला. तसेच राज्य माहिती आयुक्त असताना त्यांनी अधिकाधिक प्रकरणे निकाली काढली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group