नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा दिल्यानंतर सुटीचा आनंद घेत असलेला लहवित येथील विद्यार्थी तेजस आहेर (वय 16, रा. लहवित, ता. जि. नाशिक) हा घरीच कुटुंबीयांसोबत बसलेला असताना अचानक भोवळ येऊन खुर्चीवरून खाली पडला. त्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याची प्राणज्योत मालवल्याचे सांगताच कुटुंबीयांना धक्का बसला.
आय. टी. इंजिनिअर होण्याचे तेजसचे स्वप्न होते. लहवितचे शेतकरी विठ्ठल महादू आहेर यांचा तेजस हा मुलगा असून, त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तेजस दहावीच्या वर्गात शिकत होता.
त्याच्यावर लहवित येथील स्मशानभूमी येथे अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील, आजोबा, बहीण, चुलते असा मोठा परिवार आहे. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ महादू गोपाळा आहेर यांचा तो नातू, तर प्रख्यात विधिज्ञ रामदास आहेर यांचा तो पुतण्या होता.