भंडारा : भंडारा जिल्ह्यात धावत्या बसमध्येच प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनंती करून देखील बस रूग्णालयात नेली नसल्याची माहिती मिळत आहे. गावकऱ्यांनी वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशाला धावत्या बसमध्ये चक्कर आली होती. तो बेशुद्ध पडला होता. बस आगारात पोहोचल्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं आहे.
गोंदिया-तुमसर-भंडारा या बसमध्ये देव्हाडी येथून एक प्रवासी बसमध्ये चढला होता. तुमसर शहराच्या वेशीवर त्याला भोवळ आली अन् तो बेशुद्ध पडला. त्याच्या दोन साथीदारांनी सदर बस रुग्णालयात नेण्याची विनंती बस वाहकाला केली. परंतु त्यांनी काहीही न ऐकता वाद घातला. बस थेट स्थानकात नेली. त्यानंतर सहकाऱ्यांनी बेशु्द्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला रूग्णालयात नेलं. तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी चालक आणि वाहकाच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. धावत्या बसमध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव चुनीलाल राऊत (३४) असे आहे. तो डोंगरला येथील रहिवासी आहे. वाहक आणि चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत . आता याबसच्या चालक आणि वाहकावर कारवाईची मागणी केली जात आहे.