आवाजाचा जादूगार , अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन
आवाजाचा जादूगार , अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन
img
Dipali Ghadwaje
मुंबई : रेडिओ/ विविध भारतीचे सर्वांत प्रसिद्ध अनाऊंसर आणि टॉक शोचे निवेदक अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते 91 वर्षांचे होते. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता दक्षिण मुंबईतील राहत्या घरी वडिलांना हार्ट अटॅक आल्याची माहिती मुलाने दिली. त्यानंतर त्यांना तातडीने एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची  प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयाशी संबंधित इतर आजारही होते. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पाठदुखीचा त्रास होता आणि याच कारणामुळे त्यांना वॉकरचा उपयोग करावा लागत होता.

रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास 42 वर्षांपर्यंत चालणाऱ्या हिंदी गाण्यांचा त्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ने यशाचे सर्व विक्रम मोडले होते. लोक दर आठवड्याला त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतूर असायचे. ‘गीतमाला’सोबत उदयोन्मुख संगीत लँडस्केपची सखोल समज दाखवून संपूर्ण शो क्युरेट करणारे आणि सादर करणारे अमीन हे भारतातील पहिले होस्ट ठरले होते. 

या शोच्या यशामुळे सयानी यांचं रेडिओ विश्वात स्थान अधिक मजबूत झालं. अमीन सयानी यांना त्यांचे बंधू हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओ इथं वयाच्या अकराव्या वर्षी कामाला लावलं होतं. अमीन यांना आधी गायक बनण्याची इच्छा होती.

‘भाइयों और बहनों’ या नेहमीच्या ओळीविरुद्ध ‘बहनों और भाइयों’ असं म्हणत संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात खूप प्रसिद्ध होती. “मैं समय हूँ..” हा महाभारत मालिकेतील त्यांचा आवाज आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

अमीन सयानी यांच्या नावावर तब्बल 54 हजारांपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती/कम्पेअर/व्हॉईसओव्हर करण्याचा विक्रम आहे. जवळपास 19000 जिंगल्सना त्यांनी आवाज दिला आहे. 

यासाठी त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. त्यांनी भूत बंगला, तीन देवियाँ, कत्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये अनाऊंसर म्हणून काम केलं होतं. रेडिओवर सेलिब्रिटींवर आधारित त्यांचा शो ‘एस कुमार्स का फिल्मी मुकादमा’ खूप लोकप्रिय झाला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group